नागपूर : ग्रामीण भागातील भुजल पातळी वाढली तर शेतकरी समृद्ध होण्यास मदत होईल. देश सुजलाम सुफलाम करायचा असेल तर शेतकऱ्यांची समृद्धी मोलाची आहे. अमृत सरोवर योजना त्यासाठी मोलाचे पाऊल ठरणार असल्याचे मत राज्याचे माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
काटोल तालुक्यात जलपातळी वाढविण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या मेंढेपठार तलावाचे भूमिपूजन आज शनिवारी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा जिल्ह्याध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आ. सुधीर पारवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, चरणसिंगजी ठाकूर, जिल्हा संघटन महामंत्री किशोर रेवतकर, तालुका अध्यक्ष योगेश चाफले, उपाध्यक्ष उकेश चव्हाण, सरपंच दुर्गाताई चिखले, जि. प. सदस्य पार्वतीबाई काळबांडे, माजी जि. प. सदस्य चंद्रशेखर चिखले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश ठाकरे, मनोज कोरडे, संदीप सरोदे आणि सोनबा मुसळे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमात त्यांनी अमृत सरोवर योजनेविषयी सांगितले आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलावाचे संवर्धन करण्यात येणार असून नागपूर जिल्ह्यात पहिला तलाव विकसित करण्यासाठी काटोल तालुक्यातील मेंढेपठाची निवड करण्यात आली आहे.
पुढे ते म्हणाले, देश सुजलाम सुफलाम करायचा असेल तर शेतकरी समृद्ध व्हायला पाहिजे. ग्रामीण भूभागात जलपातळी वाढवायची असल्यास पाणी जिरविण्याची योजना रुजविणे गरजेचे आहे. मेंढेपठार तलावाचे संवर्धन झाले तर त्याचा फायदा संपूर्ण काटोल तालुक्याला होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांना असल्याने या तलावांची निवड करण्यात आल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मा. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंवर्धनाचे मोठे काम झाले. परंतु आज सत्तेत असलेल्या सरकारने त्या योजनेकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण भागातील भूजल पातळीत घट झाल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.