नागपूर : माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप करणाऱ्या सुरज तातोडेच्या विरोधात त्याच्याच भावंडानी पोलिसांत धाव घेतली आहे. सुरज याने बावनकुळेंवर खोटे आरोप केलेच पण तो आमच्या विरोधातही षडयंत्र रचतोय असे नीरज व धीरज तातोडे यांचे म्हणणे आहे.
पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर धीरज व नीरज तोतोडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही २००७ साला पासून आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच राहतो. त्यांनीच आम्हाला लहानाचे मोठे केले. शिक्षणाचा सगळा खर्चही त्यांनीच केला. सौ. ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांनी मायेचा आधार दिला आणि स्वतःच्या पायावर उभे केल्याचे धीरज तातोडे म्हणाले तर आईवडील वारले तेव्हा बावनकुळे कुटुंबं आमच्या जगण्याचा मुख्य आधार बनल्याचे नीरज तातोडे म्हणाले.
सुरज तातोडे यांना २०१८ साली मेंदूचा झटका आला. यावेळी त्यांच्यावर झालेला उपचारांचा खर्च हा देखील निस्वार्थ भावनेने आ. बावनकुळेंनी केला. या आजारासाठी आ. बावनकुळेंना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे धीरज तातोडे म्हणाले तर सुरज यांना हा त्रास पूर्वीपासूनच असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात असे नीरज यांनी सांगितले. यानंतरच सुरज यांना मानसिक आजार जडला आहे. आम्हाला त्याच्या प्रकृतीची काळजी वाटते. त्याला भेटण्यासाठी आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पण त्यानेच आमची बदनामी करणे प्रारंभ केल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे धीरज आणि नीरज तातोडे म्हणाले.
– प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न
आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी असलेले तातोडे कुटुंबाचे घरोब्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्याच्या यशाचे आम्ही भावंडं साक्षीदार असून, सुरज यांनी केलेले आरोप बावनकुळेंची सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे धीरज आणि नीरज तातोडे म्हणाले.