नागपूर: कोरोना संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या गरीब कुटुंबांना खनिकर्म निधीतून आरोग्याच्या, धान्याच्या व जीवनावश्यक वस्तूच्या कीट देण्याची मागणी
आपण केली होती. पण ग्रामीण भागातून ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायतीकडून आलेल्या याद्यांच्या कुटुंबांना या निधीतून अजूनही आवश्यक कीटचा पुरवठा करण्यात आला नाही, याकडे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
जिल्हाधिकार्यांना बावनकुळे यांनी एक पत्र लिहून कळविले आहे.
खनिकर्म निधीतून अनेक कुटुंबांना आवश्यक असलेल्या कीट देण्यात आल्या आहेत. पण ग्रामीण भागातील गरीब आणि रेशनकार्ड नसलेल्या गरीब कुटुंबांना अजूनही आवश्यक कीट-मदत मिळाली नाही. ग्रामपंचायतच्या सरपंचांनी व पदाधिकार्यांनी, तसेच नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या पदाधिकारी आणि अधिकार्यांनी सर्वेक्षण करून गरीब आणि रेशनकार्ड नसलेले परिवार शोधून त्यांची यादी तयार केली आहे. या तीनही शासकीय संस्थांकडून आलेल्या याद्यांनुसार जीवनावश्यक वस्तूंचे कीट त्या कुटुंबांना देण्यात यावेत.
एखाद्या व्यक्तीचे नाव दुसर्या जिल्ह्याच्या रेशनकार्डावर असेल त्या आधारावर त्याचे नाव रेशनकार्डातून कापले गेले आहे. अशा कुटुंबालाही जीवनावश्यक कीट देण्यात यावा. तसेच धान्याचे कीटही देण्यात यावे. कोरोना संचारबंदीच्या काळात लाभार्थी अन्य जिल्ह्यातील आहे, हा निकष न लावता केवळ गरीब असल्याचा निकष लावून त्याला शासनाच्या योजनांची सर्व मदत मिळावी अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.