Published On : Fri, Apr 6th, 2018

बीजाईच्या पूजेने झाली बीजोत्सवाची सुरूवात


नागपूर: बीजोत्सव हा शेती करणाऱ्या, शेती जाणणाऱ्या आणि शेतीविषयी आस्था असणाऱ्या सर्वांचाच समूह आहे. पर्यावरण पूरक कार्य करणारा प्रत्येक घटक बीजोत्सवाचाच एक भाग आहे असे मानणाऱ्या समविचारी मंडळींची ही चळवळ आहे. इथे बीजाई केंद्रस्थानी असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही बीजोत्सवाचा आरंभ शंभराहून अधिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बीजाईच्या पूजेनं झाला. सकाळच्या सत्रात अमिताभ पावडे यांनी जी.एम. कॉटन च्या दुष्परिणामांवर आपले विचार मांडले. सहज वाणाच्या कापसापेक्षा वरचढ अर्थकारणाचे स्वप्न दाखवून जी.एम. कॉटन शेतकऱ्यावर थोपवला गेला असून त्याने शेतकऱ्याचे नुकसानच अधिक केले आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कीड नियंत्रित न झाल्याने उत्पादनात झालेली घट आणि जी.एम. कापसामुळे पसरलेले त्वचारोग यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीतच सापडला. आज तो सहज वाण मागत आहेत पण कृषी सेवा केंद्रावर तो उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे.

डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी शेती व अर्थकारणाबरोबर शेतीविषयक विद्यापीठांवर अधिक जोर दिला. आज गावागावातील मुला-मुलींना माती, पाणी, वाण याबाबतचे तांत्रिक शिक्षण दिल्यास शेतकऱ्यास आपल्या मातीची प्रत तपासायला शहरांकडे धावावे लागणार नाही. तसेच तरूणांना गावात रोजगार उपलब्ध होतील. शेती व इतर सहाय्यक उद्योक सक्षम करण्याकरता सरकारने पुढे यायला हवे असे मत त्यांनी मांडले.

दुपारी २ वाजतापासून प्रदर्शन व विक्री सुरू झाली. बीजोत्सवाबद्दलची माहिती नागपूरातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली असल्याचे पहिल्या दिवशीच्या गर्दीने जाणवून दिले. समाजमाध्यमांद्वारे केल्या गेलेल्या प्रसार व प्रचाराचा यात मोठा वाटा आहे. बीजोत्सवाच्या प्रदर्शनात यावर्षी ६५ हून अधिक स्टॉल्स आले आहेत. नाशिक, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, दर्यापूर, नांदेड, यवतमाळ जिल्हा, नागपूर जिल्हा येथून आलेल्या या स्टॉलधारकांकडे संपूर्ण सेंद्रिय माल असल्याची खात्री बीजोत्सवचे कार्यकर्ते देतात. पर्यावरण पूरक उत्पादने व पशुपालक समूहाचा सहभाग हा यावर्षीच्या प्रदर्शनाचे वेगळे वैशिष्ट्य दिसून येते. देशी वाणाचे पशु आपल्या संपूर्ण जीवसृष्टीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून यांचे पालन-पोषण व संवर्धन करणाऱ्या या समूहाचे महत्त्वाचे योगदान आहे हे शहरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे बीजोत्सव हे माध्यम ठरते.

Gold Rate
Friday 31 Jan. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावर्षीच्या बीजोत्सवात सहभागी शेतकरी व प्रदर्शनाला भेट देणारे शहरी ग्राहक यांची संख्या बघता सेंद्रिय शेतमालाला ग्राहक मिळवून देणे आणि शहरी ग्राहकापर्यंत विषमुक्त धान्य व खाद्यपदार्थ पोहोचवणे हे बीजोत्सवामागचे प्रमुख उद्दिष्ट सफल झाल्याचे समाधान वाटते.

संध्याकाळी ४ वाजेपासून अश्विन रामटेके व जितेंद्र माकोडे हे चित्रकार बीजोत्सवास भेट देणाऱ्यांचे पोर्ट्रॆट बनवून देत होते. बऱ्याच ग्राहकांनी हा निराळा आनंद अनुभवला. याव्यतिरिक्त संध्याकाळच्या कलोत्सवात संदीप सारथी, हुमायर अली, स्वरूप भाटिया, विनोद विद्रोही यांनी आपले कवितावाचन केले. कुणाल दांडेकर व वैभवी कोल्हे यांनी गिटार-वादन केले. रितेश यादव, अथर्व तापस व शंतनू भावे यांनी स्वतःच्या रचना सादर केल्यात.

पशुपालन समूहाचे प्रतिनिधीत्व व कलोत्सव हे यावर्षीच्या बीजोत्सवातील विशेष आकर्षण ठरले.

बीजोत्सवातील मेजवानीस यावर्षीही लोकांनी दिलखुलास पसंदी दिली. लाखोळी डाळीचे वडे, नाचणीची इडली, मोहफुलाचे बोंडे, गूळाची जिलबी व सुरण फ्राय हे पदार्थ अल्पोपहारात होते तर कुलथ्याची भाजी, मिश्र डाळीची पोळी व कोदोची खीर हे जेवणातले आकर्षण ठरले. अल्पोपहारातील पदार्थ पुढचे दोन दिवसही ठेवले जाणार असून ग्राहकांनी बीजोत्सवातील फूड स्टॉलला अवश्य भेट द्यावी असे आम्ही आवाहन करतो.

उन्हाळ्याची उष्णता लक्षात घेता दिवसभर अंबाडीचे सरबत, कैरीचे पन्हे व बेलाचे सरबत ठेवण्यात येत आहे.

Advertisement