नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने नुकतीच माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.यानंतर देशमुख यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरींशी आमचे कौटुंबीक संबंध आहेत. त्यातून भेट घेतली, असे देशमुखांनी सांगितले. काल मी शिर्डीवरून आलो. श्रद्धा, सबुरीचे आशिर्वाद मी घेतले आहेत. पुढील वाटचाल तशीच असणार आहे.
कोणत्याही आमदारकीची, खासदारकीची मागणी मी केलेली नाही. कार्यकर्ता म्हणून काम करावे लागल्यास ती माझी तयारी आहे, असे देशमुख म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे अ.भा. संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्यावरही देशमुख यांनी टीका केली होती.तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही ओबीसीच्या मुद्यावर माफी मागण्याचा सल्ला दिला होता.
याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने गंभीर दखल घेत देशमुख यांना ५ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केले होते. यावर देशमुख यांनी सादर केलेल्या उत्तराने समितीचे समाधान झाले नाही.त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने कठोर पाऊले उचलत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.