नागपूर : गरज ही शोधाची जननी आहे. स्टार्टअप संदर्भात राज्याचे नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. या अनुषंगाने येत्या पाच वर्षात मटेरियल अर्थव्यवस्थेपक्षा डिजिटल अर्थव्यवस्थेला जास्त महत्त्व असून यामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. नागपूरसह राज्यातील बारा जिल्ह्यात स्टार्टअप इको सिस्टीम सुरु करण्यात येत असून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मिहान येथे संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील डिफेन्स पार्क तयार होत असून कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी टाटासोबत तीनशे कोटी रुपये गुंतवणुकीचा संरक्षण क्षेत्रातील कौशल्य विकास पार्क सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे फार्च्युन फाऊंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने युथ एम्पॉवरमेंट समिटचे (युवा सक्षमीकरण परिषद) आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, खासदार विकास महात्मे, आमदार सर्वश्री प्रा.अनिल सोले, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधाकर देशमुख, ना गो गाणार, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राजेश बागडी, प्रा.कुणाल पडोळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, युवक वर्गातून रोजगार व स्वयंरोजगाराची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. तर दुसरीकडे उद्योग क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले युथ एम्पॉवरमेंट समिट हा एक स्त्युत्य उपक्रम आहे. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. राज्यात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये वाढ होत असून महाराष्ट्र आता यामध्ये अग्रेसर आहे. देशात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी निम्मी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात झाली आहे. या माध्यमातून 35 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहे.
अर्थव्यवस्थेसंदर्भात श्री. फडणवीस म्हणाले, आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारची मंदी पहावयास मिळते. मात्र आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सात टक्क्याची वाढ दिसते आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही आपली अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. जीडीपीमध्ये झालेली वाढ ही वाढत्या रोजगाराच्या संधींचे द्योतक आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा विकासदर अव्वल आहे. राज्यात रोजगाराच्या संधीमध्येही वाढ होत आहे. 2029 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. सेवाक्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी असून याद्वारे हे उद्दिष्ट 2025 पर्यंतच साध्य होऊ शकते.
पायाभूत सुविधा क्षेत्रासंदर्भात श्री. फडणवीस म्हणाले, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही मोठ्या रोजगार संधी असल्याने राज्यात पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढविण्यात आली आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या निर्मितीद्वारे 30 लाख रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. बंदरे असलेल्या शहरांचा व पर्यायाने राज्यांचा अधिक वेगाने विकास होताना दिसतो. समृद्धी महामार्गाद्वारे राज्यातील 24 जिल्हे बंदरांशी जोडून विकास साधण्यात येणार आहे. त्यामुळे आता उद्योग आणि रोजगारासाठी विशेष क्षेत्र किंवा ठराविक गावेच महत्त्वाची ठरतील असे राहणार नाही. राज्यातील सर्व ठिकाणच्या उद्योगांना यामुळे एकसमान फायदे मिळतील.
विविध क्षेत्रातील रोजगार संधीबाबत श्री. फडणवीस म्हणाले, अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कद्वारे वस्त्रोद्योगाला चालना देण्यात आली आहे. यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. वर्धा, यवतमाळ व नागपूरमध्येही टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे. मेक-इन-महाराष्ट्र मध्ये नागपूर डिफेंस क्लस्टरला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. हवाई क्षेत्रातील मोठे प्रशिक्षण केंद्र नागपूरमध्ये सुरु होत आहे. राफेल विमाने आता पूर्णपणे आपल्या देशातच तयार होणार आहेत. यासाठी आपल्याला कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर द्यावा लागेल. मिहान व ड्रायपोर्टमध्येही मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण होत आहेत. नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने नागपूर लॉजिस्टिक हब बनू शकते. मेक-इन-महाराष्ट्रद्वारे मागास जिल्ह्यातही गुंतवणूक वाढत असून याद्वारे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊन देशात दहा कोटीहून अधिक युवकांनी स्वयंरोजगार सुरु केला. व ते स्वयंपूर्ण बनले. नागपूर जिल्ह्यातही मुद्रा योजनेचा लाभ घेऊन युवक स्वयंपूर्ण बनत आहे. तरुणाईने निश्चित केले तर नवा मार्ग तयार करुन युवक उंच भरारी नक्कीच घेऊ शकतात, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी मुद्रा योजना, स्टार्टअप व स्टॅण्डअप इंडिया याअंतर्गत नवीन उद्योग व्यवसाय सुरु केलेल्या युवकांना धनादेशाचे वाटप तसेच विविध कंपन्यामध्ये निवड झालेल्या युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मुद्रा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, जिल्हा अग्रणी बँकेचे अयुब खान तसेच जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला.
प्रास्ताविकात आमदार प्रा.अनिल सोले म्हणाले, युथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून एकाच छताखाली युवकांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. यंदा या मेळाव्यात मुद्रा योजनेअंतर्गत पाचशे जणांना लाभ देण्यात आला आहे. तीन हजार युवकांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. यामध्ये अनेक अपंगांनाही रोजगार संधी उपलब्ध झाली आहे.