पाच गटातील महिलांचा सहभाग : एक महिना व्यावसायिक प्रशिक्षण
नागपूर: महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या भजन मंडळाला व्यावसायिक प्रशिक्षण देणे सुरू करून नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले आहे. प्रशिक्षणाला सोमवारपासून (ता. १०) सुरुवात झाली असून एक महिना हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे.
प्रशिक्षणाची सुरुवात रामनगर येथील हनुमान मंदिरात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी उपसभापती विशाखा मोहोड, समिती सदस्या दिव्या धुरडे, सरीता कावरे, खान नसीम बानो, रश्मी धुर्वे, मनिषा अतकरे, जिशान मुमताज अन्सारी, वैशाली नारनवरे, माजी नगरसेविका सीमा दामोधर कन्हेरे यांची उपस्थिती होती.
महिला बचत गटांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करणे या हेतूने त्यांची आवड असलेल्या विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार पहिले प्रशिक्षण भजन मंडळासाठी आयोजित करण्यात आले असून यापुढेही विविध प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी दिली.
सदर प्रशिक्षण शिबिरात संघमित्रा भजन मंडळ (गंगा नगर, काटोल रोड), माऊली भजन मंडळ (न्यू बिडीपेठ), स्त्री शक्ती भजन मंडळ, गुरुमाऊली भजन मंडळ, स्वरा महिला बचत गटाच्या ५० सदस्या सहभागी झालेल्या आहेत. मनपातर्फे अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ असून यापुढे असेच प्रशिक्षण सुरू राहणार असल्याचे समितीच्या सदस्य दिव्या धुरडे यांनी सांगितले. या प्रशिक्षण शिबिरासाठी माजी नगरसेवक दामोधर कन्हेरे यांनी जागा उपलब्ध करून दिली असून कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राध्यापिका संगीता राऊत ह्या प्रशिक्षण देत आहेत.
१५ डिसेंबरपासून महिलांना बॅण्ड वाजविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर बांबू आर्ट, फोटोग्राफी, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.