मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश : नागरिकांचे हित व सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय
नागपूर: नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधीबाग महाल झोन अंतर्गत भालदारपुरा प्रभाग क्रमांक १९ या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार गांधीबाग महाल झोन क्रमांक ६ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक १९ च्या निश्चित केलेल्या कॅटेनमेंट एरिया दक्षिण-पूर्वेस चिटणीस पार्क (घाटे रेस्टॉरेंट), उत्तर-पूर्वेस अग्रसेन चौक, उत्तर-पश्चिमेस तारेकर भवन पोस्ट ऑफिस, दक्षिण-पश्चिमेस टाटा पारसी स्कूल हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहेत. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
आतापर्यंत मनपातर्फे सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसर, गांधीबाग महाल झोन मधील बैरागीपुरा प्रभाग क्रमांक २२, आसीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्र. ३ आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत प्रभाग क्र. ७ मधील बहुतांश परिसर, सतरंजीपुरा झोन अंतर्गत दलालपूरा प्रभाग क्रमांक २१, मंगळवारी झोन अंतर्गत प्रभाग १० आणि धरमपेठ अंतर्गत प्रभाग १२ आदी भाग सील करण्यात आले आहेत. या सर्व भागांमध्ये मनपाद्वारे दैनंदिन अत्याआवश्यक सामुग्रीही पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.