भंडारा: प्रेमप्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखनी तालुक्यातील एका तरुणी नागपूर येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती. तिथे तिची ओळख एका तरूनासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतल्या आणि गुपचूप लग्नही केले.
काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली. त्यावेळी त्याने तिला नकार दिला.
खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकराविरोधत तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले. तरुणीला पोलीस अधिकाऱ्याच्या उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली. त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची भेट घेतली. अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात ३५४ अ , ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.