भंडारा:- कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक गंभीर होती. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून चढतीला लागलेला रुग्ण वाढीचा आलेख मे च्या तीसऱ्या आठवड्यात उतरणीला लागला असला तरी संकट अद्याप टळलेले नाही. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व हात वारंवार स्वच्छ करणे या त्रिसुत्रीमुळेच कोरोनावर मात करणे शक्य आहे. 18 एप्रिल रोजी पिकपॉईंट ला असलेली क्रीयाशिल रुग्णांची संख्या 12 हजार 847 आज 19 मे रोजी 1 हजार 621 वर आली आहे. आकड्यांचा आलेख घसरणीला लागला असला तरी दक्षता व काळजीचा आलेख मात्र चढताच ठेवावा लागेल.
मार्च 2020 मध्ये सुरू झालेल्या कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या पहिल्या लाटेवर भंडारा जिल्ह्याने यशस्वीपणे नियंत्रण मिळवले होते. मार्च 2021 च्या शेवटी शेवटी आलेल्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशासह जिल्ह्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. रुग्ण वाढीचा वेग 18 एप्रिल 2021 पर्यंत कायम राहीला. दरम्यान जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजना आखल्या. 12 एप्रिल रोजी सर्वाधिक म्हणजे 1 हजार 596 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर 1 मार्च रोजी सर्वाधिक 35 मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली. त्यानंतर केलेल्या ‘ब्रेक द चैन’ व विविध उपाय योजनामुळे रुग्ण संख्या कमी कमी होत गेली. 22 एप्रिल रोजी सर्वाधिक 1 हजार 568 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचीच संख्या जास्त आहे.
15 फेब्रुवारी 2021 रोजी क्रीयाशील रुग्णांचा 97 असलेला आकडा 18 एप्रिल रोजी 12 हजार 847 वर पोहचला होता. आता हा आकडा 1 हजार 621 वर आला आहे. 19 एप्रिल रोजी रुग्ण बरे होण्याचा दर 62.58 टक्के होता आता तो 95.38 टक्क्यांवर गेला आहे. 12 एप्रिल रोजी 55.73 टक्के असलेला पॉझिटिव्ही दर आज 5.33 टक्क्यांवर आला आहे. 8 एप्रिल पर्यंत एकेरी आकड्यात असलेली मृत्यू संख्या 9 एप्रिल पासून 12 मे पर्यंत दोन अंकी संख्येत होती. आती ती पुन्हा एकेरी संख्येत आली आहे. ही संख्या शुन्य करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटसह 75 खाटांचे रुग्णालय उभारले जात आहे. सनफ्लॅग कारखान्याजवळ 500 खाटांचे सर्व सोईसुविधा युक्त जम्बो रुग्णालय उभारले जाणार आहे. तीसरी लाट लहान मुलांना घातक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याअनुषंगाने सामान्य रुग्णालयात पिडीयाट्रीक वार्ड तयार करण्यात येत आहे. यासाठी 50 खाटा असणार आहेत. औषधसाठा, प्राणवायू उपलब्ध ठेवणे व मृत्यूदर कमी करणे याला प्राधान्य राहील.- जिल्हाधिकारी संदीप कदम