नागपूर: जिल्ह्यातील भानेगाव वारेगाव कामठी या रस्त्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाली असून या रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. या रस्त्यामुळे कोराडी खापरखेडा येथून कामठीकडे जाणार्या नागरिकांना कामठी कॅन्टॉनमेंटमधून जाण्याची गरज राहणार नाही. कोराडी खापरखेडा येथून सरळ कामठीच्या मुख्य मार्गावर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7) नागरिकांना पोहोचता येणार आहे.
या रस्त्यामुळे नागरिकांना संरक्षण विभागाच्या रस्त्यावरून जाण्याची गरज राहणार नाही. परिणामी संरक्षण विभागाला होणारा वाहतुकीचा त्रासही वाचणार आहे. कामठी ते वारेगाव या रस्त्याची लांबी 7.75 किमी असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 व 69 ला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्याची 3/200 किमी लांबी ही कामठी छावणी परिसरातून जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षण विभागाचे कार्यालय व परेड मैदान आहे.
संरक्षण विभागाच्या 3.200 किमी लांबीतून अतिशय मंद गतीने वाहने चालवावी लागत होती. वाहतुकीला प्रचंड त्रास व वेळेचा अपव्यय होत होता. म्हणून छावणी परिसराच्या पश्चिम सीमेजवळून राष्ट्रीय महामार्ग 7 पर्यंत बाह्य वळन मार्गाची गरज होती. या वळणमार्गाच्या मंजुरीसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व ब्रिगेडिअर धरमवीर सिंग यांनी अथक प्रयत्न केले. छावणी विभाग मंत्रालय दिल्ली यांच्याकडून प्रस्तावित 2.52 किमी क्षेत्रफळाचा वळण मार्ग व 4.54 हेक्टर जागा हस्तांतरणास संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळविली. 10 एप्रिल 2015 ला ब्रिगेडिअर कमांडंट यांनी संरक्षण विभागाच्या मालकीच्या पर्यायी रस्ता वापरासाठी व बांधकामासाठी परवानगी दिली.
पालकमंत्र्यांनी 5 कोटी 52 लक्ष रुपयांच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली. या कामात संरक्षण विभागाच्या छावणीच्या जागेस संरक्षण भिंत व कुंपण करून देण्यात येत आहे. वळण मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. संरक्षण भिंत व कुंपणाचे काम लवकरच पूर्ण होत आहे. या रस्त्यामुळे नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.