चंद्रपूर : शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. या घटनेत अंधेवार यांच्या पाठीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली.
चंद्रपूर येथील आझाद बगीच्यालगत रघुवंशी कॉम्प्लेक्स ही इमारत आहे. बँक, शिकवणी वर्ग, जिम, मसाज सेंटर व बियर बारमुळे या कॉम्प्लेक्समध्ये नागरिकांची रेलचल सुरु असते. याच कॉम्प्लेक्समध्ये मनसेच्या कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे कार्यालय आहे.
माहितीनुसार,आज दुपारी दिड वाजताच्या सुमारास अंधेवार कार्यालयात येण्यासाठी रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या लिफ्टजवळ आले. तिथे त्यांनी लिफ्टची बटन दाबली आणि लिफ्टचा दरवाजा उघडण्यापूर्वीच त्यांच्या मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या व्यक्तीने बंदुकीतून दोन फायर केल्या. त्यातील एक गोळी अंधेवार यांच्या पाठीला लागली. या घटनेनंतर संपूर्ण कॉम्प्लेक्स धावपळ उडाली.पाठीवर गोळी लागल्याने अंधेवार रक्ताच्या थारोळ्यात माखलेले व्हिडीओमध्ये दिसत आहेत. अंधेवार यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला. बल्लारपुरातील बहुरिया हत्याकांडाचे कनेक्शन गोळीबारामागे असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रभावती एकुरके ताफा घेवून घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे महेश कोंडावर हे देखील घटनास्थळी आले. त्यांनी जखमी अंधेवार यांना कुबेल हॉस्पीटल येथे उपचारासाठी नेले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.