मुंबई: भैय्युजी महाराज यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्रातील महाराष्ट्राचा वारसा हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
भैय्युजी महाराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, त्यांचे व्यक्तीमत्व कायम हसतमुख, उत्साही आणि उर्जा प्रदान करणारे होते. त्यामुळे त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. भैय्युजी महाराज यांचे अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम होते. निराशेवर मात करणारी नवी उमेद जागवण्याची अचाट क्षमता त्यांच्याकडे होती.
समाजातील सर्व घटकांशी भैय्युजी महाराजांचे अत्यंत सलोख्याचे व मैत्रिपूर्ण संबंध होते. त्यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा होता. संपूर्ण भारतात मोठ्या संख्येने चाहता वर्ग त्यांनी निर्माण केला होता. विखे पाटील कुटुंबांशी त्यांचा जवळचा संबंध होते. मागील अनेक वर्षांपासून आमचा नियमित संपर्क होता.
कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी अनेक वेळा शिर्डी परिसराला भेट दिली होती, अशा अनेक आठवणी जागवून विखे पाटील यांनी भैय्युजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली.