Published On : Fri, Sep 7th, 2018

पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

Advertisement

नागपूर : गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाचा होणारा -हास व गणेश विसर्जनामुळे शहरातील तलावांची दुर्दशा पाहता मागील वर्षी नागपूर महानगरपालिकेने शहरातील तीन तलावांमध्ये गणेश विसर्जन पूर्णत: बंद केले होते. या निर्णयाला नागपुरकरांनी उत्तम प्रतिसाद दर्शवून गणेश मूर्ती कृत्रिम तलावांमध्येच विसर्जीत केल्या. नागरिकांच्या या सहकार्याबद्दल मनपा त्यांचे आभार मानते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

सक्करदरा येथे गणेश विसर्जनासाठी तयार करावयाच्या कृत्रिम तलावाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेविका स्नेहल बिहारे, नगरसेवक मनोज चापले, नेहरू नगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, उप अभियंता (लोक कर्म) एस.पी.रक्षमवार, कनिष्ठ अभियंता किशोर माथुरकर, रवी महल्ले, नंदेश सावरकर, ईश्वर गिद, श्री. गिरडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
11 April 2025
Gold 24 KT 94,100/-
Gold 22 KT 87,500/-
Silver / Kg - 92,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, गणेशोत्सवात गणेश विसर्जनादरम्यान शहरातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते. यावर प्रतिबंध म्हणून मागील वर्षी सक्करदरा, गांधीसागर व सोनेगाव तलाव गणेश विसर्जनासाठी बंद करण्यात आले होते. याऐवजी परिसरात कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते.

नागपूर महानगरपालिकेच्या या निर्णयाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. यंदाही सक्करदरा तलाव परिसरात कृत्रिम तलावांसह १२ मोठे कृत्रिम टँक उभारण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेउन गणेश विसर्जन कृत्रिम तलाव अथवा टँकमध्येच करावे, शिवाय याबाबत प्रत्येक नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात यावी, असेही महापौर नंदा जिचकार यावेळी म्हणाल्या.

पर्यावरण संवर्धनासाठी शाळांमधून जनजागृती करणार : आमदार सुधाकर कोहळे
दक्षिण नागपूरमध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी दरवर्षी व्‍यवस्था करण्यात येते. यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होउन पर्यावरणासाठी सहकार्य केले. पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. संपूर्ण शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्‍हावा, यासाठी शाळांमधून जनजागृती करण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार सुधाकर कोहळे यांनी यावेळी केले. नागपुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्‍हावा, यासाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासंबंधी शहरातील विविध शाळांशी संपर्क साधणार असल्याचेही आमदार सुधाकर कोहळे म्हणाले.

Advertisement
Advertisement