Published On : Sat, Aug 28th, 2021
By Nagpur Today Nagpur News

गोपाल नगर सिमेंट रोड कार्याचे भूमिपूजन : ४ कोटी १५ लाख निधीतून तयार होणार रस्ता

गोपाल नगर सिमेंट रोड कार्याचे भूमिपूजन : ४ कोटी १५ लाख निधीतून तयार होणार रस्ता

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये सिमेंट रोड निर्मितीचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे अनेक फायदे आज दिसून येत आहेत. डांबरी रोडवर पावसाळ्यात पडणारे खडे, रस्त्यांची दुरावस्था अशी कुठलीही तक्रार सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांबाबत नाही. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे व डागडुजीसाठी लागणारा खर्चही आता कमी झाला. सिमेंट रोड ही पुढील ५० वर्षाच्या सुविधेची तरतूद आहे. एकदा सिमेंट रोड तयार झाले की पुढील ५० वर्ष यासंदर्भात नागरिकांना त्रास होणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Gold Rate
Tuesday25 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 96,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग ३७ मधील गोपाल नगर येथे मनपाचे क्रीडा समिती सभापती व स्थानिक नगरसेवक प्रमोद तभाने यांच्या विशेष प्रयत्नातून ४ कोटी १५ लक्ष निधीमधून साकारण्यात येणा-या सिमेंट काँक्रीट रोड निर्मिती कार्याचे शनिवारी (ता. २८) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर महापौर दयाशंकर तिवारी, भाजपा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, डॉ. परिणय फुके, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, माजी महापौर संदीप जोशी, नंदा जिचकार, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, नगरसेवक तथा भाजपा दक्षिण पश्चिम नागपूर अध्यक्ष किशोर वानखेडे, नगरसेविका सोनाली कडू, भाजपा महाराष्ट्र महिला महामंत्री अश्विनी जिचकार, माजी नगरसेवक गोपाल बोहरे, नितीन महाजन आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, दक्षिण-पश्चिम नागपूर हा आपला मतदार संघ असून या मतदार संघातील बहुतांशी मुख्य मार्ग व आतील मार्ग हे सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत. याशिवाय संपूर्ण नागपूर शहरातील सुद्घा अनेक मार्गांचे सिमेंटीकरण होत आहे. याच श्रृंखलेमध्ये आता गोपालनगर येथील रस्ताही येणार आहे. या रस्त्याच्या सिमेंटीकरणाकरिता मागील अनेक दिवसांपासून प्रभागातील चारही नगरसेवक प्रमोद तभाने, दिलीप दिवे, नंदा जिचकार व सोनाली कडू हे प्रयत्न करीत होते. मात्र यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर मनपामध्ये विशेष बैठक घेउन संपूर्ण अडचणी जाणून घेण्यात आल्या व रस्त्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र यानंतरही यासंदर्भात प्रमोद तभाने यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून संपूर्ण कार्याला अंतिम रूप मिळेपर्यंत प्रयत्न केले व त्याचेच फलीत आज भूमिपूजन केले जात असल्याचे ते म्हणाले. भूमिपूजनानंतर काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना काही त्रास होणे स्वाभाविक आहे त्यामुळे हा त्रास सहन करून कार्याला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गोपालनगरशी आपला स्नेह जुना असल्याचे यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस यांनी त्यांच्या कार्याची सुरूवात याच गोपालनगर परिसरातून केली. त्यांच्यासोबत काम केलेले अनेक ज्येष्ठ आजही परिसरात आहेत. आधी वडीलांना आशीर्वाद देणा-या गोपालनगर वासीयांनी सलग २५ वर्ष आपला आशीर्वाद सोबत ठेवला. त्यामुळे गोपालनगर येथे आल्याचा आनंद होत असून गोपालनगर येथे येणे हे घरी आल्यासारखी भावना असल्याचेही ते म्हणाले.

नागपूर शहरातील रस्ते, क्रीडा मैदान व बगीचे यांचा सर्वत्र आज विकास होत आहे, याचे श्रेय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच जाते, अशी भावना महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली. आपल्या शहरातील व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतो त्यावेळी आपल्या शहरातील समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देतो ही बाब आपण सर्वांनीच पाहिली. त्यामुळे आजपर्यंत कधीही नागपूर शहराला न मिळालेल्या निधीपेक्षा जास्त निधी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला. झोपडपट्ट्यांमध्ये राहणा-या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी कायदा करून पट्टे मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्यही त्यांनी केले. त्याचेच फलीत आज दक्षिण-पश्चिम नागपूरमधील सुमारे ६० टक्के नागरिकांना त्यांचे मालकीहक्क पट्टे मिळाले आहेत. तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढेही असेच सुरू ठेवावेत, अशी अपेक्षाही महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकामध्ये स्थानिक नगरसेवक तथा क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने म्हणाले, गोपाल नगर भाजी मंडी चौकातील रस्त्यावर असणारी वर्दळ आणि निर्माण होणारी वाहतुकीच्या समस्या यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंबंधी येथील नागरिक, व्यापारी, दुकानदारांमार्फत सुमारे ३५ ते ४० तक्रारी व निवेदन प्राप्त झाले. त्यामुळे या मार्गावर सिमेंट रोडचे बांधकाम होणे अत्यावश्यक बाब असल्याचे लक्षात घेत कार्यवाही करण्यात आली.

मात्र प्रशासकीय स्तरावरील अडथळ्यांमुळे मार्गातील कामामध्ये बाधा निर्माण झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ही बाधा लक्षात आणून देताच त्यांनी जातीने लक्ष घालीत मनपामध्ये स्वत: बैठक घेतली व प्रशासनाशी चर्चा करून यामधील अडचणी दूर केल्या. त्याचेच फलीत आज या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याच विशेष पुढाकाराने या मार्गासाठभ तब्बल ४ कोटी १५ लाख रूपये निधी तातडीने मंजुर सुद्धा झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असेही ते म्हणाले.

अनेक वर्षांपासून मार्गामुळे होणारी समस्या सिमेंट रोडमुळे सोडविली जाणार आहे. त्यामुळे येथील रहिवासी व मुख्यत: दुकानदार व व्यापारी बांधवांना याचा लाभ होणार आहे. या कार्यासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल गोपालनगर व्यापारी एकता संघाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. मुकुंद घुगरे, विजय मांगे, प्रदीप विंचुरकर, अमोल राउत, वसंतराव गोडे यांनी शाल, पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे संचालन विमलकुमार श्रीवास्तव यांनी केले तर आभार शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक मेंढी, प्रदीप चौधरी, नंदकिशोर मानकर आदींनी सहकार्य केले.

Advertisement