नागपूर : जिल्ह्यातील पारशिवनी येथे कन्हान पोलीसस्टेशनअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवंश तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 58 गुरांची सुटका करण्यात आली.
माहितीनुसार, कन्हान टोलनाक्याजवळ मध्यप्रदेशातून येणाऱ्या एका डबलडेकर ट्रकची झडती घेण्यात आली. या वाहनात एकूण 58 गायींना क्रूरपणे बांधून ठेवण्यात आले होते. सर्व गुरे मुक्त केल्यानंतर त्यांची रवानगी देवलापर गाय संशोधन केंद्रात करण्यात आली आहे.याप्रकरणी गुरे, मोबाईल फोन, ट्रक असा एकूण 46 लाख 71 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अस्लम अब्दुल हकीम खान, शहजाद फन्नेखान मन्सूरी, दोघेही रहिवासी मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी अनीस खान रा. मध्य प्रदेश हा फरार झाला आहे. या घटनेबाबत कन्हान पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.