नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर केला आहे. यादरम्यान करदात्यांसाठी त्यांनी मोठी घोषणा केली. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून मोदी सरकारकडून मध्यमवर्गीय नागरिकांना मोठं गिफ्ट देण्यात आले आहे.
१२ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ८० हजारांपर्यंत फायदा होणार आहे. तर १२ लाख ते १६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५% कर आकारला जाणार आहे. वेगळं भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. नव्या पद्धतीनुसार कर भरणा करणाऱ्या करदात्याचं उत्पन्न १२ लाख रुपये असेल, तर त्याला ८० हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे १०० टक्के कर माफ होईल.
एखाद्या करदात्याचं उत्पन्न १८ लाख असेल, तर त्याला नव्या बदलांमुळे ७० हजारांचा फायदा होईल. याचा अर्थ त्याचा ३० टक्के कर सवलत मिळेल. २५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना १ लाख २५ हजारांचा कर कमी होईल, अर्थात त्याला करात २५ टक्के सूट मिळणार आहे.
‘या’ नुसार आखण्यात आली नवी करप्रणाली-
० ते ४ लाख – शून्य, ४ ते ८ लाख – ५ टक्के, ८ ते १२ लाख – १० टक्के, १२ ते १६ लाख – १५ टक्के, १६ ते २० लाख – २० टक्के, २० ते २४ लाख – २५ टक्के, २४ लाखांवर – ३० टक्के अशी असणार आहे.