नागपूर : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे.
हा भारतासाठी मोठा झटका मानला जातो. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नसल्याने भारतीयांनी निराशा व्यक्त केली. भारतीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले की, कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे.
भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट’ आहे.
भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाह, असे समितीने म्हटले आहे.