मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकरणारे मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे-पाटील यांना आझाद मैदानावर परवानगी नाकारली आहे.
मराठा आंदोलनाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करणार होते. पण मुंबई पोलिसांनी त्यांच्या आंदोलनासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनससमोरील आझाद मैदानात परवानगी देण्यास नकार दिला आहे. हा जरांगे-पाटील यांना मोठा धक्का मानला जातो. मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांची पायीदिंडी पुण्यात पोहोचल्यानंतर आता मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
पुण्यातील अभूतपूर्व स्वागतानंतर लोणावळ्यात आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पोहोचला. मनोज जरांगे यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार केला आहे. तसेच समाजाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आजपासून मुंबईकडे पायीदिंडीने मनोज जरांगे प्रस्थान करणार आहेत. यासाठी नवी मुंबईत सुद्धा जंगी तयारी करण्यात आली आहे. मात्र तत्पूर्वी त्यांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर परवानगी नाकारल्याने हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.