नागपूर – टेकइन्फ्रा डेव्हलपर्स अॅण्ड इंजिनिअर्स लिमिटेड या बिल्डर कंपनीला ग्राहकांसोबत केलेल्या अन्यायाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, नागपूर यांनी दिलेल्या निर्णयात कंपनीला फ्लॅटचा ताबा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रकरणाचा आढावा-
2015 मध्ये अनिल कुमार अग्रवाल आणि राजेश मोहनलाल अग्रवाल यांनी रेसिडेन्सिया, नागपूर येथील फ्लॅट बुक केला होता आणि संपूर्ण ₹24 लाखांची रक्कम भरली होती. 2017 मध्ये विक्रीअर्जावर सही करूनही बिल्डरने त्यांना आजपर्यंत फ्लॅटचा ताबा दिला नव्हता.
आयोगाने बिल्डरला दोषी ठरवत खालीलप्रमाणे आदेश दिले:
ग्राहकांना फ्लॅटचा ताबा तात्काळ द्यावा.
2015 पासून ₹24 लाखावर 9% वार्षिक व्याज द्यावे.
मानसिक त्रासासाठी ₹1 लाख व खटल्यासाठी ₹10,000 नुकसानभरपाई द्यावी.
आयोगाने हे स्पष्ट केले की, संपूर्ण रक्कम घेतल्यानंतरही ताबा न देणे हे सेवेमध्ये त्रुटी आणि अन्यायकारक व्यापार पद्धती ठरते.
ग्राहकांचे वकील अॅड. ऋषभ आर. अग्रवाल व अॅड. सुयश आर. अग्रवाल यांनी जोरदार युक्तिवाद सादर करून बिल्डरच्या हलगर्जीपणावर प्रकाश टाकला आणि ग्राहकांना न्याय मिळवून दिला.
दरम्यान ही कारवाई इतर ग्राहकांसाठीही एक जागरुकता निर्माण करणारी ठरणार आहे.