Published On : Fri, Jul 13th, 2018

भारत ‘हिंदू राष्ट्र’ व्हावे हा भाजपा आणि संघाचाच एजेंडा – उद्धव ठाकरे

Advertisement

मुंबई : काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी काल एका कार्यक्रमात विवादित वक्तव्य केले होते. २०१९ मध्ये भाजपा परत सत्तेत आली तर भारत हा ’हिंदू पाकिस्तान’ होईल असे म्हटले होते. थोडक्यात काय तर, पुढील निवडणुकीत मोदींचे राज्य आले तर भारत ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित केले जाईल.

भाजपा आणि संघाचा हाच अजेंडा आहे व थरुर यांनी तो काँग्रेसच्या व्यासपीठावरून मांडला आहे. थरुर हे मूर्खासारखे बोलतात व त्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी असे भाजपास वाटते. पण थरुर हे भाजपचीच भाषा बोलत आहेत हे समजून घेतले पाहिजे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ‘हिंदू पाकिस्तान’ वक्तव्यावर भाष्य करत भाजपावरही प्रहार केला आहे.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आजचा सामना संपादकीय…
बायकोच्या खून प्रकरणात शशी थरुर हे महाशय आरोपी आहेत. सध्या ते जामिनावर आहेत. त्यामुळे थरुर यांची मानसिकता व नियत याविषयी काय बोलावे? थरुर यांच्या विधानाची गांभीर्याने दखल घ्यायची गरज नाही. पण भाजपने मात्र थयथयाट सुरू केला आहे. थरुर यांच्या विधानामुळे हिंदूंचा अपमान झाला. हिंदुस्थानची मान शरमेने खाली गेली, अशी विधाने भाजपच्या प्रवक्त्याने केली आहेत. मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, शशी थरुर यांच्या बेताल विधानांमुळे फक्त करमणूक होत असते हे ज्यांना कळत नाही त्यांनी राजकारणात उगाच लुडबुड करू नये असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

भारतास ‘हिंदू पाकिस्तान’ म्हणावे अशी स्थिती नाही. पाकिस्तानात वेगळ्या प्रकारचे अराजक निर्माण झाले आहे. तेथे लोकशाही व्यवस्था नष्ट झाली आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, लुटमार या राक्षसांनी थैमान घातले आहे. सत्य बोलणार्‍यांचे नरडे तेथे बंद केले जात आहे. पाकिस्तान हे जन्मतःच असे आहे, पण हिंदुस्थानमधील प्रश्न संपले आहेत काय? तेदेखील तसेच आहेत.

नोटाबंदीनंतर गरीबांचे अर्थशास्त्र कोलमडले आहे. मदरशांत कोणी काय कपडे घालावेत यावर सरकारी आदेश निघतात. गाई आणि बकर्‍या वाचविण्यासाठी सरकारी फर्मान निघते, पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवता येत नाहीत. अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहात नाही, पण लोकांच्या भावनेला हात घालण्यासाठी ‘रामायण एक्सप्रेस’ सोडण्याचे प्रकार रेल्वे करत असते अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

मणिशंकर अय्यर हे सरळसरळ पाकिस्तानधार्जिणे आहेत. पत्नी सुनंदा पुष्करच्या संशयास्पद हत्येनंतर थरुर यांचे नाव ज्या बाईशी जोडले गेले ती पाकिस्तानी महिला होती आणि दिग्विजय सिंग यांच्याविषयी काय बोलावे! जामा मशिदीच्या इमामाची ‘टोपी’ घालूनच ते वावरत असतात. हे सर्व लोक नावाने हिंदू आहेत. बाकी त्यांचे वर्तन एका अर्थाने ‘सुन्ता’ झाली असेच आहे. त्यामुळे भाजपने आकांडतांडव करण्यापेक्षा या लोकांना फार महत्त्व देऊ नये असा सल्लाच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

ही तिन्ही मंडळी भाजपच्या राजकारणाला पोषक असेच बोलत असतात. लोकांना तर असाही संशय आहे की, थरुर, मणिशंकर, दिग्विजय हे म्हणजे भाजपने काँग्रेसच्या कळपात सोडलेले ’पोपट’ आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

हिंदुस्थानची फाळणी काँग्रेसमुळे झाली. काँग्रेस हा फाळणीचा गुन्हेगार आहे. पाकिस्तान जर धर्माच्या नावावर निर्माण झाला असेल तर उरलेला भाग हा ‘हिंदुस्थान’ म्हणजे हिंदू राष्ट्रच आहे. पण नेहरू-पटेल वगैरे मंडळींनी हिंदुस्थानला ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी बनविण्याचा गुन्हा केला, असे संघ परिवारातील मंडळी नेहमीच म्हणत आली. नेहरू वगैरे मंडळींनी जर हा गुन्हा केला असेल तर ही चूक दुरुस्त करण्याची संधी देशाच्या जनतेने भाजपला दोन वेळा दिली. पहिल्यांदा श्री. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले होते तेव्हा व आता दुसर्‍यांदा मोदी यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण बहुमताचे हिंदुत्ववादी सरकार आले तेव्हा. त्यामुळे भारत हे हिंदुराष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी २०१९ पर्यंत थांबण्याची गरज नाही. अशी घोषणा श्री. मोदी आताही करू शकतात व त्यांनी ती घोषणा लगेच करावी असा आमचा आग्रह आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.

२०१९ सालापर्यंत हे गॅसचे रंगीत फुगे हवेत सोडले जातील व २०१९ साली पुन्हा नव्या घोषणा होतील. याला रामराज्य म्हणता येणार नाही. थरुर हे मूर्खासारखे बोलतात व त्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी असे भाजपास वाटते. पण थरुर हे भाजपचीच भाषा बोलत आहेत हे समजून घेतले पाहिजे. भाजपचे एक आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी प्रभू श्रीरामासही बलात्कार रोखता येणार नाहीत, असे विधान केले. हा समस्त हिंदूंचाच अपमान आहे. याबद्दल अमित शहांनी माफी मागावी काय? आम्ही म्हणतो, शशी थरुर यांनाही प्रणवबाबूंप्रमाणे संघाने प्रवचनासाठी बोलवायला हवे असा सल्लाच उद्धव ठाकरेंनी देऊन टाकला आहे.

Advertisement