नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापले आहे. यापार्श्वभूमीवर महायुती सरकारमध्ये जागावाटपावरून वादंग पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर असल्याचं चित्र आहे. कारण रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ‘कमळ’ चिन्हावर लढली जावी, अशी मागणी भाजप जिल्ह्याध्यक्षांनी केल्याने महायुतीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यासंदर्भांत भाष्य करत म्हटले की, रामटेकमधील उमेदवाराने कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी, रामटेकची जागा भाजपला मिळावी ही माझी मागणी आहे.
सध्या मी नागपूर जिल्ह्याचा दौरा करत आहे.प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची ही मागणी आहे, की रामटेक लोकसभेचा उमेदवार हा कमळ चिन्हावर लढला पाहिजे, हा उमेदवार आमचा असला पाहिजे, ही फक्त कार्यकर्तेच नाही, तर बूथ स्तरावरील मागणी आहे. त्यामुळे रामटेकची जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही असल्याचे कोहळे म्हणाले.