तुळजापूर, उस्मानाबाद: गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या गळ्यात सराईत गुन्हेगारा सारख्या पाट्या घालणारे सरकार कर्जबुडवे उद्योगपती निरव मोदी, मेहुल चोकसी व विजय मल्या यांच्या गळ्यात पाट्या घालून फोटो काढणार का ? असा प्रश्न करून भाजप सरकारने महाराष्ट्राचे तीन तेरा वाजवले आहेत अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय व्हिजन २०१९ या प्रशिक्षण शिबिरात बोलत होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंचनामे करण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या गळ्यात सराईत गुन्हेगारा सारख्या पाट्या घालून फोटो काढण्यात आले , हे च का सरकारचे मी लाभार्थी अभियान? असा सवाल खा. चव्हाण यांनी केला. राज्यातील शेतक-यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे देण्यात आली. मात्र त्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीच्या बाबतीत सरकारला कोणतेही गांभीर्य नसून संवेदनशीलता नाही. केंद्र सरकारने जाहिरातींवर ३ हजार कोटी रुपये खर्च केले, राज्य सरकारने मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमावर ५ कोटी रुपये खर्च केले गेले. जाहिराती व इव्हेंटवर कोट्यवधी रूपये खर्च करून सर्वत्र झगमगाट आहे असे दाखविले जात आहे. पण प्रत्यक्ष या सरकारच्या काळात राज्यात 13 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर जवळपास दोन हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिव्याखाली अंधार अशी राज्याची परिस्थिती आहे असे खा. चव्हाण म्हणाले.
भाजप सरकार उद्योगपतीच्या मदतीने राज्य सुजलाम सुफलाम करण्याची भाषा करीत आहे. देणार, होणार , करणार , अशी जर-तर ची भाषा सत्तेत बसलेले लोक वापरत आहेत. मात्र गेल्या साडेतीन वर्षात काय केलं ते सांगत नाहीत. सरकारकडून फक्त इव्हेंट मॅनेजमेंटच काम सुरू आहे . एकीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याची भाषा केली जाते दुसरीकडे सरकारी नोक-यांत ३० टक्के कपात केली जाते. फक्त घोषणा आणि दावे केले जातात मात्र मेक इन इंडियामधून किती रोजगार निर्माण झाले हे सरकार सांगत नाही असे खा. चव्हाण म्हणाले.
सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यांवर घोटाळ्यांचे गंभीर आरोप आरोप आहेत पण सरकार सर्वांना क्लीन चीट देत सुटले आहे. एका बुलेटप्रूफ गाडीसह २२५ व्हीआयपी गाड्या खरेदीचा निर्णय शासनाने घेतला आहे. जनतेचा पैसा उधळण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा नावावर ढोंग केले जात आहे, गारपीट, बोडअळी, तुडतुडे यामुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ३१३ कोटी रुपयांची मदतीची घोषणा करण्यात आली मात्र या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती क्षेत्राचे तीन तेरा वाजले आहेत. बुथ लेवल पासून संघटन मजबूत करून लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष तीव्र करावा असे आवाहन खा. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले.
देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मधुकर चव्हाण, बस्वराज पाटील, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, प्रवक्ते उल्हास पवार, किशोर गजभिये यांनी या शिबिराला मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळ यांनी सादरीकरण केले. विनायक देशमुख यांनी सुत्रसंचालन केले.
यावेळी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, शैलेश पाटील चाकूरकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आप्पा साहेब पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधीपक्षनेते शरण पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव आबा दळवी, सत्त्संग मुंडे, शाह आलम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरस्थळी येण्यापूर्वी खा. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन राज्यातील आणि केंद्रातील जुलमी सरकारला सत्तेवरून घालवून बळीचे राज्य आणण्यासाठी शक्ती देण्याचे साकडे घातले. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मधुकरराव चव्हाण, बस्वराज पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.