जळगाव :काँग्रेसने लोकशाही व धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करून या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपासली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्ष जातीयवादाचे व धार्मिक द्वेषाचे विष पसरवून राजकीय फायद्यासाठी देश तोडण्याचे काम करत आहेत, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेनेच्या नाकर्त्या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली आहे. आज जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे या यात्रेच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ झाला. यावेळी आयोजित विशाल जनसभेला मार्गदर्शन करताना खर्गे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, फैजपूरच्या पावन भूमित १९३६ साली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात लोकशाही आणि संविधानाबाबत महत्त्वाची चर्चा झाली व त्यामुळेच पुढे आपल्याला जगातील सर्वोत्कृष्ठ संविधान मिळाले. पण भाजपचे लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. नरेंद्र मोदींनी देशाच्या सामाजिक एकतेचे आणि अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. देशातील कायदा सुव्यवस्थेची दयनीय स्थिती, इंधन दरवाढ, घोटाळे व भ्रष्टाचाराची प्रकरणे, दलित, महिला, अल्पसंख्यांकांवरील अत्याचार, शेतक-यांच्या आत्महत्या याबाबत पंतप्रधान काही बोलत नाहीत. पण राजकीय फायद्यासाठी वारंवार खोटे बोलून देशातील जनतेची फसवणूक करत आहेत. दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्यांचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? शेतीमालाला दीडपट हमीावाचे काय झाले? साठ वर्षात काय झाले? हे विचारणा-या मोदींनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकालात काय केले? ते सांगावे. इंधनावरील कर वाढवून सरकारने सर्वसामान्यांच्या खिशातले १२ लाख कोटी रूपये काढून घेतले. या पैशातून शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देणे शक्य आहे पण मोदी शेतक-यांना लाठ्या काठ्याने झोडपत आहेत व आपल्या उद्योगपती मित्रांची हजारो कोटींची कर्ज माफ करत आहेत. मोदींना सर्वसामान्यांचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे भाजपला पराभूत करून पुन्हा काँग्रेसचे सरकार आणा असे आवाहन खर्गे यांनी उपस्थितांना केले
या सभेला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले की, फैजपूरची ऐतिहासीक भूमी उर्जा देणारी आहे. फैजपूरच्या अधिवेशनाने देशाला दिशा दिली व जुलमी इंग्रज सरकारच्या तावडीतून देशाला मुक्त केले. तसाच प्रकारे भाजपला सत्तेवरून दूर केल्याशिवाय आता हा जनसंघर्ष थांबणार नाही. देशोतली लोकशाही व्यवस्था मोडीत काढून हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गांधीजींच्या चरख्यासोबत फोटो काढणा-यांच्या पूर्वजांचे स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान आहे? असा सवाल करून राजकीय फायद्यासाठी भाजप महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावांचा वापर करत आहेत. त्यांच्या विचारांशी भाजपचा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्वासनामुळे त्रस्त झालेली जनता आता विचारतेय क्या हुआ तेरा वादा? पण मुख्यमंत्र्यांकडे याचे काही उत्तर नाही. भाजपचा भ्रष्ट चेहरा आता राज्यातील जनतेसमोर आला असून भाजपला पराभूत केल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे खा. चव्हाण म्हणाले.
यावेळी बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिवसेनेने आजवर २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपर्यंत सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकविरोधी आहे, शेतकरी विरोधी असे वाटत असेल तर शिवसेनेने तात्काळ या सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विरोधी पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरेंना दिले. विद्यमान सरकार गांधीजींचे नाव घेते. पण प्रत्यक्षात त्यांनी गांधीजींच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम करत आहे. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेची द्विसुत्री दिली. पण हे सरकार खरे कधी बोलत नाही आणि खोटे बोलण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही. १०० गोबेल्स मेले असतील, तेव्हा भारतीय जनता पक्ष जन्माला आला असेल, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. देशाच्या आणि राज्याच्या सोडा पण जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांवरही या सरकारकडे उत्तर नाही. भाजपने दिलेले आश्वासन दिलेले केळी संशोधन केंद्र केव्हा स्थापन करणार? कापूस संशोधन केंद्र केव्हा तयार होणार?जळगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र का पळवले गेले? खान्देश विकास महामंडळ स्थापन करणार की नाही? अशा कोणत्याही प्रश्नाला हे सरकार उत्तर देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्ह्याला न्याय देऊ शकणार नाही. एकनाथ खडसेंनी भाजपसाठी रक्त आटवले. पण जो भारतीय जनता पक्ष एकनाथ खडसेंचा होऊ शकला नाही, तो जळगाव जिल्ह्याचा काय होणार? असा सवाल करून स्व. मधुकरराव चौधरी यांच्या काळातील विकासाचे युग पुन्हा परत आणायचे असेल तर जळगाव जिल्ह्याने काँग्रेसला भरभरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. नसीम खान, हर्षवर्धन पाटील, खा. हुसेन दलवाई, आ. निर्मला गावीत, आ. भाई जगताप युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत माजी आ. दिलीप सानंदा माजी आ. शिरीष चौधरी, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा प्रदेश सचिव सत्संग मुंडे, तौफिक मुलाणी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.