नागपूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आले.या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या. यात काटोल मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला. कारण या मतदारसंघावर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावान अविनाश ठाकरे दावा ठोकणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने निष्कासित केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आशिष देशमुखांची डोकेदुखी वाढणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात अनिल देशमुख तब्बल चार वेळा निवडून आलेत. पण यावेळेस भाजपने काटोलची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून याठिकाणाहून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी भाजपचे दोन नेते अविनाश ठाकरे आणि आशिष देशमुख यांच्या रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
अविनाश ठाकरे हे भाजपचे निष्ठावान नेते-
अविनाश ठाकरे हे भाजपचे निष्ठावान नेते असून गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी पक्षाची ताकदीने काम केले आहे. नागपूर महानगर पालिकेतून ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. यासोबतच त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच सत्तापक्ष नेते म्हणूनही त्यांनी काम केले.
भावी आमदार म्हणून झळकले पोस्टर –
अविनाश ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काटोल मतदारसंघात ठाकठिकाणी भावी आमदार म्हणून त्यांचे पोस्टर झळकले असून विधानसभेसाठी त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
सामान्य जनतेच्या मनातील माणूस म्हणून त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
ठाकरे यांच्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, आशिष देशमुख भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजपने अविनाश ठाकरे यांच्याकडे २०१९च्या विधानसभेच्या अगोदर विस्तारक पदाची जबाबदरी दिली. त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच बांधकाम विभागातील कामगारांना साहित्य वाटप इत्यादी महत्त्वाचे कामे पार पाडली. सावरगाव सारखी ग्रामपंचायत १९-० ने निवडूनही त्यांनी दाखवली आहे.
अविनाश ठाकरे दावा ठोकणार-
काटोल मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तेव्हापासूनच भाजपने या मतदारसंघात संपूर्ण ताकद लावली.त्याअनुषंगाने अविनाश ठाकरे यांनी युद्ध पातळीवर तयारी सुरु केली. तर दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले आशिष देशमुख हे देखील याठिकाणाहून विधानसभेची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.मात्र भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.