नागपूर : शिवसेनेपाठोपाठ आता स्वपक्षीय भाजपच्या आमदारांनीही गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत. प्रशांत बंब केवळ चौकशी लावतात आणि ब्लॅकमेलिंग करतात, असा आरोप आमदार मोहन फड यांनी बंब यांच्यावर केला आहे. प्रशांत बंब यांनी भ्रष्टाचार बाहेर काढावा. मात्र, वारंवार केलेल्या तक्रारींमुळे अधिकारी काम करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. औरंगाबादेतील शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनीही प्रशांत बंब यांच्यावर आरोप केले आहेत.
विशेष म्हणजे यामध्ये काही भाजपा आमदारांचाही समावेश आहे. या आमदारांनी प्रशांत बंब यांच्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली आहे. आमदार बंब यांनी विविध खात्यातील सुमारे एक हजारांहून अधिक अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींचे पुढे काय झाले याची कुणालाच माहिती नाही.
या तक्रारींमुळे अधिकाऱ्यांवर चौकशी सुरु केली जाते व त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे खोळंबतात, मात्र, त्यांनतर कंत्राटदार कामे करायला तयारी नाहीत, असे या आमदारांनी म्हटले. या संदर्भात फडणवीस यांनी योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना), तानाजी मुटकुळे, मोहन फड (दोघे भाजपा) आदी आमदारांनी विधिमंडळाच्या आवारात माध्यमांना सांगितले.