नागपूर : शहरात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर विकासाचे दावे किती पाण्यात आहेत, हे समोर आले आहेत. शहरातील नागरी समस्यांबाबत आता भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी आवाज उचलत याला नागपूर महानगर पालिकेला जबाबदार धरले. ‘नागपूर टूडे’शी संवाद साधताना त्यांनी नागपूरकरांना उद्भणाऱ्या समस्यांवर चर्चा केली.
स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नागपूरची दुरावस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून याठिकाणी प्रशासक राज आहे. मात्र नागरिकांच्या समस्यांशी त्यांना काहीच देणेघेणे नाही. नागपूर महानगर पालिकेच्या निवडणूक न झाल्याने शहराचा कारभार प्रशासनाच्या खांद्यावर आल्याने त्याला अंकुश लावणारे कोणीच नाही. आगोदर जनतेचा कान आणि डोळा नगरसेवक असतो. मात्र ते नसल्याने जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकाचा त्रास पाहता अनेक माजी नगरसेवक त्यांच्या तक्ररारी घेऊन नागपूर महानगर पालिकेत जातात पण तेथील अधिकारी जनतेची कामे करण्यास त्यांच्या समस्या ऐकून घेण्यास टाळाटाळ करतात, असे कुकडे म्हणाले.
मनपा प्रशासनाचा माजी नगरसेवकांशी चर्चेचा अभाव-
नागपुरात १५१ माजी नगरसेवक आहेत. माजी महापौर आणि माजी उपमहापौर देखील आहेत. महानगर पालिकेने यांच्याशी विचारविनिमय करून शहरातील समस्या सोडविण्याची गरज आहे. मात्र ते देखील होत नाही, असा आरोपही कुकडे यांनी केला.
शहरातील नाले सफाईत प्रशासनाचा हलगर्जीपणा-
पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले स्वच्छ करण्याची विनंती वारंवार आम्ही मनपा प्रशासनाला केली. मात्र याकडेही दुर्लक्ष झाले.नागपूर मनपाने नाले सफाईत हलगर्जीपणा केल्यामुळे नाले पावसामुळे तुडूंब भरले. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
महानगरपालिका निवडणूक कधी होणार ?
नागपूरसह अनेक महानगरपालिकांची मुदत उलटून गेल्यामुळे त्या विसर्जित झाल्या आहेत. त्यामुळे या महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतरच ही निवडणूक होईल, असे कुकडे म्हणाले. तसेच केंद्रीय मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वात नागपूरचा विकास जोमाने सुरु असल्याचेही कुकडे म्हणाले.
जनतेचे पैसे वाचवण्यासाठी शहारात सिमेंट रस्ते-
नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले होते. पावसाच्या या प्रकोपासाठी सिमेंट रस्ते बांधणी कारणीभूत असल्याचा आरोप सार्वत्रिकरित्या केला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी सिमेट रस्त्याचे काम सुरू आहे. तेथे पावसाचे पाणी अडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र शहरात सिमेंट रस्त्यांची गरज काय ? असा सवाल कुकडे यांना विचारण्यात आला. यावर जनतेच्या पैसे वाचवण्यासाठी शहारात सिमेंट रस्ते बांधण्यात येत असल्याचे ते म्हणाले. सिमेंट रस्ते जास्त काळ टिकत असल्याने हे रस्ते बांधण्यात येत असल्याचे कुकडे यांनी सांगितले.