नालासोपारा :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पैसे वाटपाचा आरोप सुरु झाला आहे. नालासोपारा येथे बहुजन विकास आघाडीने भाजपवर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. या ठिकाणी भाजप नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आडीच्या (बीवीए) कार्यकर्त्यांनी घेरले आहे, यासंदर्भातला व्हिडीओ न्युज 18 लोकमतने प्रकशित केला.
बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
नालासोपारा मतदारसंघात ही घटना घडली आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजन नाईक यांचा काँग्रेसच्या संदीप पांडे यांच्याशी सामना होणार आहे. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीनेही क्षीतिज ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. विनोद तावडे मंगळवारी दुपारी येथे राजन नाईक यांच्या प्रचारासाठी आले होते. ते येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते.
बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मते, विनोद तावडे यांनी स्वतः त्या ठिकाणी मतदारांना पैसे दिले. भाजप सरचिटणीस विनोद तावडे नालासोपाऱ्यात पैसे वाटत असल्याची वार्ता पसरताच बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी तावडे यांना या प्रकरणी जाब विचारला. पण तावडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत, या आरोपांत कोणतेही तथ्य नसल्याचा दावा केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाजपचा खेळ खल्लास!
जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले!
निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो! pic.twitter.com/BcGKRVSOkj— Sanjay Raut (@rautsanjay61) November 19, 2024