नागपूर: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपप्रणित महायुतीला मोठा फटका बसला. यापार्श्वभूमीवर भाजपाला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने त्यांच्या मुखपत्रातून खडेबोल सुनावण्यात आले. ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपवर लाखाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे हवेत गेलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांना वास्तवाची जाण करून देणारा ठरला आहे. मोदींच्या लोकप्रियतेमुळे तळातील सामान्यांचा आवाज न ऐकणाऱ्या भाजपाला ही एक चपराक असल्याचे संघाने म्हटले आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही निकाला नंतर भाजपवर टीकेची झोड उडवली आहे.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर अनेक पुस्तके लिहिलेल्या रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याचे म्हटले. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले. “महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली, असा घणाघात रतन शारदा यांनी केला.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य हे भाजपाचे मैदानावर काम करणारे कार्यकर्ते नाहीत. स्वंयसेवकांची मदत मागण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते कुठेतरी कमी पडले, असेही शारदा म्हणाले.