नागपूर:विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे.
महायुतीमध्ये भाजप 3 जागांवर लढणार असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. भाजपकडे विधान परिषद निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक होते. भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र आहेत. नागपूर महानगर पालिकेत 4 टर्म नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी सत्तापक्ष नेता, स्थायी समिती अध्यक्ष, नागपूरचे महापौरपद भूषविले आहे. दरम्यान महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने या पाचही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होण्याइतके संख्याबळ आहे.