नागपूर: आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात 48 सभा घेण्याचे उद्दिष्ट भाजपाच्या वतीने ठेवण्यात आले आहे. त्यातील पहिली सभा नांदेड लोकसभा मतदारसंघात होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या सभेला संबोधित करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
निवडणुकीची तयारी म्हणून भारतीय जनता पक्षाने 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख नेमले असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
अमित शहा सभेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमंशी बोलताना सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत प्रश्न विचारला असता, आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करणार असल्याचेही ते म्हणाले. 200 प्लस विधानसभा आणि 40 प्लस लोकसभेच्या जागा निवडून आणण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी म्हणून मोदी सरकारला नऊ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नऊ वर्षांचा लेखाजोखा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष अभियान रबविण्यात येणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. यामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघात 48 सभा होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.