नागपूर : औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील शहिदांना गुरुवारी ४ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले.
कामठी रोडवरील दहा नंबर पूल चौक इंदोरा येथील नामांतर शहीद स्मारकस्थळी भाजपा प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. मिलिंद माने, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष संजय भगत, महामंत्री राजेश शामकुवर, स्वप्नील भालेराव, विजय शेवाळे, सुरज राऊत, प्रभाग १३ च्या अध्यक्ष गीताताई मेश्राम, महामंत्री लक्ष्मी मोरे, कांचन बोरकर, उपाध्यक्ष रितेश मेश्राम, प्रभाग १४ वार्ड अध्यक्ष गंगाधर रामटेके, विवेक शेंडे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदान नागपूरनेच दिले. ४ ऑगस्ट १९७८ ला नागपुरातील पाच भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो. आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगलेल्या बाबासाहेबांना विद्यापीठाचे नाव मिळावे यासाठी आपल्या प्राणाचे बलीदान देणा-या सर्व शहीद भीमवीरांना विनम्र अभिवादन करीत असल्याची भावना यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली. याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी वीर शहिदांना जयभीमची सलामी दिली.