नागपूर : राज्य सरकार ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या तयारित आहेत.सत्ताधारी भाजपच्या या निर्णयावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला.
ओबीसींना मराठ्यांविरुद्ध भडकवण्याचा भाजपाचा हा प्रकार आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून भाजपाला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे. पण, दोन्ही समाजातील जनतेने शांतता निर्माण ठेवावी , असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी नागपुरात लोकसंवाद यात्रा काढण्यात आली. त्यापूर्वी पटोले यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. जालन्यातील घटना आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर त्यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. भाजपची २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता आली, पण फडणवीस यांनी आश्वासनांची पूर्तता अद्यापही केली नाही. मराठा समाजाला भाजपने वेठीस धरले.
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता जातनिहाय गणनेशिवाय पर्याय नाही. परंतु, भाजपा त्याविरोधात आहे. आम्ही सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करू, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकू आणि कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ,असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले.