नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्यापही जाहीर झालेले नाही. मात्र तरीही सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केली. नागपुरात मात्र सर्वच्या सर्व सहाही जागा भाजपच लढणार असल्याचा दावा शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केला आहे.पूर्व नागपूरबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आभा पांडे आग्रही असताना भाजप शहराध्यक्षांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आभा पांडे यांना विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढावी लागणार असल्याची चर्चा सुरु आहे
नागपुरात पत्रपरिषदे दरम्यान कुकडे शहरातील सहाही मतदारसंघा संदर्भात भाष्य केले. नागपुरात महायुतीच्या घटकपक्षांकडून एक किंवा दोन जागांचा आग्रह होता.राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी आभा पांडे यांनी तर पूर्व नागपुरातून निवडणूक लढणार असल्याचेच जाहीर केले आहे व त्या प्रचारालादेखील लागल्या आहेत. जर महायुतीतून तिकीट मिळाले नाही तर अपक्ष लढण्याची त्यांची तयारी आहे.
दुसरीकडे उत्तर नागपुरात भाजपकडे प्रभावी उमेदवार नसल्यामुळे ती जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात येते की काय अशा चर्चा सुरू होत्या.
मात्र कुकडे यांनी सर्व चर्चांना विराम देत सहाही जागा भाजपच लढणार असल्याचे म्हटले. नागपुरात महायुतीच्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करावा, असे म्हटले आहे. २०१९ मध्ये भाजपच्या हातून दोन जागा गेल्या होत्या, मात्र यावेळी नागपुरातील सर्व जागांवर भाजपचेच उमेदवार जिंकून येणार असल्याचे कुकडे म्हणाले.