अकोला: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर काँग्रेसकडून सातत्याने भाजपवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलेल व आरक्षण रद्द करेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मात्र, संविधान कोणीही बदलू शकत नाही. भाजप असेपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द होणार नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. भाजपने १० वर्षांत बहुमताचा वापर दहशतवाद, कलम ३७०, तिहेरी तलाक, आदी हटविण्यासाठी केल्याचे ते म्हणाले.
अकोला मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित जाहीर सभेत शहा बोलत होते. यावेळी मंचावर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावना गवळी, प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, डॉ. उपेंद्र कोठीकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. अमित शहा यांनी आपल्या भाषणात महविकास आघाडीवरही हल्लाबोल केला.
‘इंडिया’ आघाडीचा राम मंदिराला विरोध होता. काँग्रेसने ७० वर्ष हा प्रश्न रेंगाळत ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० वर्षांत हा प्रश्न मार्गी लावून भव्य राम मंदिर उभारले. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था येईल,असा दावाही शहा यांनी केला.