चंद्रपूर : काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप मुख्यमंत्री पदावरून नकळत दूर करेल याची कल्पना एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळे ते झोपेत स्वप्नात देखील मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडून झोपतात , असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत एकनाथ शिंदे यांना भाजप मुख्यमंत्री पदावरून दूर करणार ,असा दावाही त्यांनी केला. ते चंद्रपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर बसविण्यासाठी भाजपाकडून मोठा डाव खेळण्यात येणार आहे. मात्र भाजपच्या या खेळीवर शिंदे गटातील मंत्री अस्वस्थ झाले आहे. या घडामोडीत मंत्र्यांना सांभाळता सांभाळता शिंदे यांची झोप उडाली आहे.