महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल २० नोव्हेंबरला मतदान पार पडले. यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती बहुमताने निवडून येणार असे स्पष्ट झाले. मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास, मुख्यमत्री कोण होणार? याबाबत राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाष्य केले आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्केच वाटते की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. राष्ट्रवादीला वाटते की अजित दादा व्हावेत आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे) वाटते की एकनाथ शिंदे व्हावेत. शेवटी निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्याच्या तिन्ही नेत्यांनी बसून करायचा असतो. तो होईल, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
…तरच महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होईल-
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे सरकार १०० टक्के येईल. कारण, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा ज्या-ज्या वर्गाला झाला आहे अथवा होणार आहे, तो वर्ग आमच्या बाजूने आहे.
वीजबिल माफी मुळे शेतकरी आमच्या बाजूने आहेत, लाडक्या बहिणी आमच्या बाजूने आहेत. गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा, यामुळे जनता आमच्यासोबत आहे.एवढेच नाही तर, केंद्र आणि राज्य सरकारच्या ५८-५९ योजना सुरू आहेत. त्यामुळे, शहरी वर्गालाही वाटते की केंद्र आणि राज्य सरकार एकत्र राहिले, तर महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होईल, असेही बावनकुळे म्हणाले.