मुंबई (Mumbai): एकेकाळी देशात आणि राज्यांतही प्रत्येक निवडणूक काँग्रेस पक्षच जिंकत असे. कामाच्या बाबतीत ‘झीरो’, पण मतपेटीत हीरो असाच काहीसा तो प्रकार होता. महाराष्ट्रात काही प्रमाणात तसे यश भारतीय जनता पक्षाला मिळताना दिसत आहे. केंद्रात श्री. मोदी व महाराष्ट्रात श्री. फडणवीस हे नवनवे जादूचे प्रयोग करून दाखवीत आहेत. लोकांना या प्रयोगात मन रमवायचे आहे तोपर्यंत भाजपास विजय मिळत जाईल व कोणी कितीही गांभीर्याने काम केले तरी त्याला पराभवाची धूळ चाखावी लागेल, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपला टपल्या हाणल्या आहेत.
राज्यात नुकत्याच झालेल्या लातूर, चंद्रपुर आणि परभणी महापालिका निवडणुकीतील यशापयशावरून शिवसेनेने भाजप आणि कॉंग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यातही कॉंग्रेसपेक्षा भाजपवर काहीसे अधिकच बाण शिवसेनेने मारले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निशाणा साधला आहे. लातूर हा अनेक वर्षे काँग्रेसचा ‘गड’ होता. विलासराव देशमुखांसारखा लोकप्रिय नेता लातूरकरांना मिळाला, पण विलासरावांच्या निधनानंतर देशमुखांची गढी कोसळली आहे. भाजप ‘झीरो’वरून ३६ वर पोहोचला व काँग्रेसचे घोडे ३३ वर अडले. भाजपचा विजय निसटता असल्याचे सांत्वन काँग्रेसवाले करून घेत आहेत. या सांत्वनास अर्थ नाही, असे सांगतानाच लातुरात काँग्रेसचा पराभव झाला तो त्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे. अर्थात राष्ट्रवादीच्या १३ जागा मावळत्या महापालिकेत होत्या तेथे एकावरच त्या पक्षाला समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या सहा जागा होत्या. आता एकही जागा जिंकता आली नाही. याचे खापर आम्ही तुमच्या त्या ‘ईव्हीएम’ मशीनवर फोडणार नाही. मात्र जनता अशी वाहवत का चालली आहे व मराठवाड्यातील शेतकरी व तरुण वर्ग गारुडय़ांच्या पुंगीमागे का चालला आहे याचा शोध घ्यावा लागेल, अशी सलही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.
दरम्यान, सध्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा मौसम आहे तो आणखी काही काळ नक्कीच राहील. केंद्रात श्री. मोदी व महाराष्ट्रात श्री. फडणवीस हे नवनवे जादूचे प्रयोग करून दाखवीत आहेत. लोकांना या प्रयोगात मन रमवायचे आहे तोपर्यंत भाजपास विजय मिळत जाईल व कोणी कितीही गांभीर्याने काम केले तरी त्याला पराभवाची धूळ चाखावी लागेल. लोकशाहीचे सौंदर्य (Beauty of Democracy) की काय ते यालाच म्हणतात हो!, असा खास ठाकरी शैलीतला टोमणाही भाजपला लगावण्यास उद्धव ठाकरे विसरले नाहीत.