गुजरात जनसंवाद रॅलीला व्हिडिओ कॉन्फरसद्वारे संबोधन
‘रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि परफॉर्म’ हाच पंतप्रधानांचा मंत्र
कोरोनावर मात करून युध्द जिंकूच
नागपूर: काँग्रेसच्या 55 वर्षाच्या तुलनेत नरेंद्र मोदींच्या 5 वर्षाच्या काळात विविध क्षेत्रात विश्वास बसणार नाही एवढी विकास कामे झाली असून, या देशाच्या विकास कामांचे चित्रच बदलले आहे. यापुढेही 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून हे लक्ष्य पूर्ण करू आणि या देशाला सुपर इॅकॉनामिक पॉवर बनवू, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
गुजरात जनसंवाद रॅलीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गडकरी संबोधित करीत होते. यावेळी गुजरात येथील मंत्री, भाजपाचे पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. कोरोना विषाणूचा सामना आम्ही करीत आहोत. अशी अनेक संकटे आमच्या देशावर आली आणि पक्षावरही आली पण त्या सर्व संकटांचा सामना आम्ही करून त्यावर मात केली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सर्व जण एकत्र येऊन या संकटांवर मात करून निश्चितपणे जिंकू असे सांगताना गडकरी म्हणाले- सकारात्मकता आणि आत्मविश्वासामुळे या संकटांवर मात करू. आमच्या पक्षानेही जनसंघाच्या काळापासून आजपर्यंत अनेक संकटांचा सामना करीत त्यावर मात केली आहे. कार्यकर्त्यांचे समर्पण आणि बलिदान यामुळे आज आम्ही भ़क्कम उभे झालो आहे. लोकतंत्र वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी बलिदान दिले. म्हणूनच देशात आणि अनेक राज्यांमध्ये आपले सरकार आहे. गरिबी हटावचा नारा काँग्रेसने दिला होता.
पण पं. नेहरूंपासून आजपर्यंत गरिबी हटली नाही, ही वास्तविकता आहे. याउलट दीनदयाल उपाध्याय यांच्या सामाजिक आणि आर्थिक चिंतनाच्या माध्यमातून आम्ही दरिद्री नारायणाला देव मानून त्याची सेवा करीत आहोत. जोपर्यंत या देशातील गरीब माणसाला अन्न, वस्त्र, निवारा मिळणार नाही तोपर्यंत आमचा उद्देश पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही.
ज्या दिवशी गरिबांना या तीनही गोष्टी मिळतील तेव्हा आमचा उद्देश पूर्ण होईल, असेही गडकरी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या सरकारने पहिल्यांदा देशातील 9 कोटी महिलांना गॅस सिलेंडर आणि शेगड्या दिल्या. 35 कोटी लोकांनी मोदींवर विश्वास ठेवून जनधन अंतर्गत बँकांमध्ये खाते उघडले. त्या लोकांच्या खात्यावर आज रकमा जमा होत आहेत.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रथमच देशातील गरिबांना घरे मिळत आहेत. लहान उद्योगांना आम्ही प्रोत्साहन दिले. गरिबांना अन्न वस्त्र निवारा, बेरोजगारांना रोजगार, गंगा शुध्द केली, जलमार्ग बनवले, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले, पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहे. रोजगारात वाढ होत आहे. आयात कमी झाली, निर्यात वाढत आहे. अर्थव्यवस्था बदलत आहे, हाच आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग आहे. विश्वास ठेवता येणार नाही एवढी कामे या सरकारने केली आहेत. देश सुपर इकॉनॉमिक पॉवर कसा बनेल या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. या देशाचे चित्रच बदलत आहे. ‘रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि परफॉर्म’ हा मंत्र मोदींनी दिला आहे, त्या मार्गावरूनच देशाची वाटचाल सुरु आहे, असेही गडकरी यांनी म्हटले.