अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज ठाकरे यांनी अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
भगवान शंकराच्या त्रिशुळाचा अपमान करू नका. त्याची तीन टोके कुठे बोचतील, हे तुम्हाला कळणारही नाही. याच त्रिशुळाने महिषासुराचा वध करण्यात आला होता. तुम्हाला आता तीन तोंडे झाली आहेत. दहा तोंडे होतील, तेव्हा त्या रावणाचा वध करण्यासाठी आमचा एकच रामबाण पुरेसा असेल.
हृदयात राम आणि हाताला काम, अशी आमची हिंदुत्वाची शिकवण आहे. तर, मुखी राम आणि बगलेत सुरी, असे भाजपाचे बेगडी हिंदुत्व आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार हे विकासाचे त्रिशूळ असल्याचा दावा केला होता . त्यावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.