अमरावती: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा उमेदवार नवनीत राणा यांना निवडणूक आयोगाने दणका दिला.अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल गावात प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाकडून नवनीत राणा यांचे बॅनर हटवण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेलमध्ये भाजपच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र हे बॅनर लावताना तळवेळ ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती.त्यामुळे हे बॅनर हटवण्यात आले आहे. निवडणूक आयोग आणि ग्रामपचांयतीकडून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.
तळवेल ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळेच हे बॅनर हटवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.भाजपकडून अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बळवंत वानखडे मैदानात उतरले आहे.