तालुकास्तरावर दूध संकलन केंद्र बंद पाडणार राज्य शासनाचा धिक्कार करणार
नागपूर: भारतीय जनता पक्षातर्फे येत्या शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी राज्यभर महाएल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी जिल्हास्तरावर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीत आहे. प्रत्येक तालुका स्तरावरील दूध संकलन केंद्र शांतपणे बंद पाडणार असून शेतकर्याप्रती उदासीन असलेल्या सरकारचा यावेळी धिक्कार करण्यात येईल असे, नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व प्रदेश भाजपाचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
या आंदोलनात राज्यभरात विद्यमान राज्य सरकारच्या धिक्काराचे फलक घेऊन भाजपाचे कार्यकर्ते सकाळी दूध केंद्रावर आंदोलन करतील. दूध संकलन केंद्र शांतपणे बंद करतील. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतील. गायीच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर 10 रुपये अनुदान, दूध भुकटी निर्यातीला प्रती किलो 50 रुपये अनुदान, शेतकर्याच्या दूध खरेदीचा दर प्रतिलिटर 30 रुपये करा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका आणि महानगरपालिका कार्यकर्ते हे आंदोलन करतील. याा आंदोलनात दुधाचे टँकर शांततेने थांबविले जातील. टँकरचालकांना आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करण्यात येईल. दूध वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी हे आंदोलन यशस्वी करावे. आंदोलन करताना ‘सोशल डिस्टसिंग’ व कोरोनासंदर्भातील अन्य नियमांचे पालन करावे. कुठेही लोकांना त्रास होईल किंवा वाहतुकीला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही प्रदेश महासचिव बावनकुळे यांनी म्हटले आहे.