नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. या निवडणुकांच्या अनुषंगाने गुरुवारी रात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आल्याची माहिती आहे.
भाजपच्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बीएल संतोष, वसुंधरा राजे सिंधिया, राजेंद्र राठोड, सतीश पुनिया, अरुण सिंग, विजया रहाटकर, सहप्रभारी नितीन पटेल, गजेंद्र सिंह शेखावत, राज्यवर्धन सिंह राठोड आदी दिग्गज नेते बैठकीला उपस्थित होते.
मध्य प्रदेशप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत भाजप इतर राज्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना किंवा केंद्रीय मंत्र्यांना तिकीट देऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान या पाचही राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ या वर्षी डिसेंबर ते जानेवारी 2024 पर्यंत आहे. छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ 3 जानेवारी, मध्य प्रदेश 6 जानेवारी 2024, राजस्थान 14 जानेवारी 2024, तेलंगणा 16 जानेवारी 2024 आणि मिझोराम 17 डिसेंबर रोजी संपणार आहे.