मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठ्यांना सरकसकट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोवर उपोषण सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल (२५ ऑक्टोबर) अचानक दिल्ली दौरा केला. या दिल्ली दौऱ्यावरूनही राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि भाजपातील काही खासदारांवर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक वेळा मराठा आरक्षणाविषयी संसदेत प्रश्न मांडला आहे. आम्ही सातत्याने संसदेत बोललो आहेत. मात्र भाजप पक्ष यावर चुप्पी साधून आहे.महाराष्ट्रात आरक्षणाविषयी एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात ,असा घणाघात सुप्रिया सुळेंनी केला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बारामतीत येऊन म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण देऊ. मात्र त्यांनी यावर काहीच केले नाही.त्यांनतर उपमुख्यमंत्री झाले. आता ते उपमुख्यमंत्री १ झाले. त्यानंतर आता पन्नास-दोनशे कॅबिनेट झाल्या, पण आरक्षणाबाबत काहीच झालं नाही. दिल्लीतील भाजपाच्या लोकसभेच्या सदस्यांनी धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यामुळे या विषयात भाजपचे पितळ उघडे पडले आहे,असा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला आहे.