गडचिरोली: राज्यातील सरकारमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत.महायुतीच्या सरकारमध्ये उभी फूट पाडण्याचे चिन्ह दिसत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपचा डाव असल्याचा दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. म्हणूनच शिंदे आजारी असल्याचा बनाव करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे आयोजित पत्रकारपरिषदेत केला.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर वडेट्टीवार पहिल्यांदाच गडचिरोली येथे आले होते. रविवारी सत्कारानंतर वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारपरिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवांपासून एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून याचे खंडन करण्यात आले होते. आज पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र महायुती सरकारमध्ये मतभेद सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. हा सर्व भाजपचा डाव असून शिंदेंना आजारी करून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट झाली. या भेटीत याच मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या भेटी संदर्भात स्वतः शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यास लोकांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न दूर होतील, असे वडेट्टीवार म्हणाले.