माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: भारतीय जनता पार्टीची सर्वच ४८ लोकसभा मतदार संघात तयारी सुरू आहे. आताच नव्हे तर यापूर्वीही भाजप ही तयारी करत होती. लोकसभा प्रवास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात १६ लोकसभा मतदार संघात संघटनात्मक बैठका होणार असून गेल्या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी दिलेल्या व्यक्तिगत लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल. प्रत्येक लोकसभा मतदार संघात केंद्रीयमंत्र्यांचा तीन दिवस मुक्काम राहणार असल्याची माहिती माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषदेत दिली.
माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, २१ जूनपासून लोकसभा प्रवास योजना सुरू होणार आहे. संपूर्ण जुलैमध्ये १६ मतदार संघात केंद्रीयमंत्री प्रवास करणार आहेत. प्रवास योजना कशी होणार, बैठक कशी होणार, याबाबत संपूर्ण कार्यक्रम आखण्यात आला आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी एक प्रभारी असून माझ्याकडेही जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. २१ जूनपासून पुढील अठरा महिने ही योजना राबविण्यात येणार आहे.
ही योजनेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षात शैक्षणिक, आरोग्याबाबत राबविलेल्या योजना, वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. याशिवाय संघटनात्मक बैठकाही होणार आहे. विविध योजनेचे लाभार्थी, नागरिक, नवमतदारांसह प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञापर्यंत या योजनेतून पोहोचणार आहे. संपूर्ण ४८ मतदार संघात भाजप तयारी करीत असून जिंकण्याचा निर्धार केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे या प्रभल्ग आहेत. त्यांचे पक्षात मोठे योगदान आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा काहीही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.
विधानपरिषद जिंकणार
विधानपरिषदेत भाजपचे पाचही आमदार निवडून येतील, अशी तयारी भाजपने केली आहे. कुणालाही पाडण्यात भाजपला रस नाही. भाजपने मतदान कसे करावे, याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी आमदारांना एकत्र बोलावले आहे. सर्वच पक्ष बोलावतात, त्यात काही नवे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.