नागपूर : राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये महायुतीला समर्थित पॅनल्सला उल्लेखनीय यश मिळाले आहे. महायुतीच्या यशावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून यावरून हे सिद्ध झाले की, जनता महायुतीच्या पाठीशी आहे.लोकसभेत महायुती ४५ हून अधिक जागा जिंकेल तर विधानसभेत सव्वादोनशे जागा जिंकू, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायत निवडणूकीत कॉंग्रेसला मोठा फटका आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यातदेखील काँग्रेसच्या पदरी निराशाच हाती आली. महायुती सरकारने ग्रामपंचायतीच्या विकासासाठी पैशाची कमतरता पडू दिली नाही. विरोधकांनी वारंवार सरकारवर निशाणा साधला. मात्र जनता नेहमी भाजपच्या पाठशी राहिली आहे.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्येही महायुतीचेच वर्चस्व राहणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. विधानसभा, लोकसभा निवडणूकींत जागा वाटपावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीत कुठलीही अडचण येणार नाही. तीनही पक्षांचे नेते चर्चा करूनच निर्णय घेतील, असे बावनकुळे म्हणाले.