कोल्हापूर : कर्नाटक – बेळगाव सीमाभागातील मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तेथील स्थानिक नागरिक पेटला आहे. यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेळगावात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने आपली सत्ता कायम राखण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली.
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे पाच उमेदवार रिंगणात असून त्यांची लढत भाजप उमेदवारासोबत होणार आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी बेळगावात आले असता टिळक चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांना काळे झेंडे दाखवले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला दरम्यान, फडणवीस यांच्याविरोधात निदर्शने करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या अकार्यशील धोरणांमुळे ळगावातील मराठी भाषिकांवर अत्याचार होत आहे. मात्र आता येथील मराठी माणूस गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावर कोणतेच कठोर पाऊले उचलली नाहीत, असे राऊत म्हणाले. इतके नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पेटला आहे. याठिकाणी मराठी माणसांची पिळवणूक केली जात आहे. तरीही शिंदे आणि फडणवीस सरकारने चुप्पी साधली आहे.