आयुक्त तुकाराम मुंढे यांची कारवाई : ८ लाखांचा दंडही ठोठावला
नागपूर : नागपूर शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कार्यात दिरंगाई करणाऱ्या जे.पी. इंटरप्रायजेस या कंपनीच्या ठेकेदाराला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक वर्षाकारिता काळ्या यादीत टाकले आहे. इतकेच नव्हे तर एकूण कार्यादेश रकमेच्या ०.२५ टक्के अर्थात ८ लाख ११ हजार ९६५ रुपये दंडही ठोठावला आहे.
मनपात पहिल्यांदाच कुठल्या ठेकेदाराविरुद्ध पहिल्यांदा अशी मोठी करण्यात आली आहे. यापूर्वी आयुक्त यांनी
क्वालिटी कंट्रोलचे काम पाहणारी क्रिएशन इंजिनियर्स प्रा. लि. आणि म.न.पा.चे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावला होता.
सिमेंट कॉक्रींट रस्ते प्रकल्प (टप्पा-३) रस्ता क्र.३१ एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी रस्त्याचे (अजीत बेकरी रोड) पेव्हर ब्लॉक मानकाप्रमाणे आवश्यक एम-४५ चे नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात आढळून आले.
प्रत्यक्षात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे क्यूरिंग पिरेड (Curing period) पूर्ण होण्याआधीच लावण्यास सुरुवात केली असल्याचे निर्देशनास आले होते. जे.पी. इंटरप्रायजेस ने केलेल्या कामाच्या मोबदल्यात मनपा रुपये ३२ कोटी ४७ लाख ८६ हजार १५१ रुपये अदा करायचे होते. मात्र, कामात त्रुटी आढळल्याने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदर कंपनीला काळ्या यादीत टाकत कार्यादेश राशीवर ०.२५ टक्के दंड ठोठावला आहे. लोक निर्माण विभाग महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.