नागपूर / वर्धा : राज्यात मान्सूनच्या आगमनापूर्वीच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली. याचदरम्यान कपाशीच्या बोगस बियाण्याच्या (Bogus Seeds) रिपॅकिंग कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी छापेमारी टाकत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखली. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्याच्या (wardha) तक्रारीवरून विविध कलमन्वये पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहा आरोपीना अटक सुद्धा करण्यात आली आहे.
माहितीनुसार, वर्धेच्या म्हसाला परिसरातील एका घरामध्ये कपाशीच्या बोगस बियाण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांना येथे मोठ्या प्रमाणात बियाणे, विविध कंपनीचे बनावटी बियाने पॅकेट, पॅकिंग मशीन, वजन काटा आदी साहित्य आढळून आले. पोलिसांनी सखोल तपास केला असता हे बियाणे गुजरात येथून आणत वर्धेत रिपॅकिंग करून संपूर्ण विदर्भात विकले जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यानंतर पोलीस महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली.
रात्रभर चालेल्या या कारवाईत पोलिसांना विविध माहिती प्राप्त झाली. घटनास्थळावरून पोलिसांनी ट्रक, चारचाकी वाहन, मोटारसायकल, कपाशीचे सुटे बियाणे, बियाणे भरलेले पॅकेट, पेंटिंग, पॅकिंग आणि सिलिंग मशीन, वजनकटा, रकामे विविध कंपनीचे छापील पॅकेट आणि तीन लाख रुपये रोख, मोबाइल असा एकूण एक कोटी ५५ लाख ८३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कापसाचे बोगस बियाणे गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील गावातून आणले असल्याची माहिती मिळाली.
गेल्या एक महिन्यापासून हा कारखाना सुरु होता. यांनी आतापर्यंत विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा यासह इतर जिल्ह्यात वेगवेगळ्या कृषी केंद्र मार्फत बियाण्याची विक्री केली. यापूर्वी यांनी १४ टन बोगस बियाण्याची विक्री केली आहे. कृषी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून वेगवेगळ्या कलमन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. यातील मुख्य आरोपी हा वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील राजू जयस्वाल याला अटक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी आणि पोलीस विभागाकडून वेगवेगळ्या पथक तयार करण्यात आले आहे. कोणत्या कृषी केंद्रावर विक्री केली याचा शोध घेत या रॅकेटचा पर्दाफाश करून सर्वाना अटक करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी दिली.
पोलिसांनी सर्व आरोपींवर 420, 468, 469, 471, 120 (ब) भादवि सहकलम 7 (सी), 6(बी) 7 (ए), 61 बियाणे अधिनियम 1966, सहकलम 7, 8 बियाणे अधिनियम 1968, सहकलम 3 व 9 8 (अ) खंड बियाणे नियंत्रण आदेश 1983 सहकलम 15 पर्यावरण अधिनियम 1986 सहकलम 3 2 (ड) 1 जिवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 12 (ग) कापूस बियाणे नियम 2009, सहकलम 6, 8, 9 पर्यावरण संरक्षक नियम 1989, सहकलम 63 कॉपीराईट अधिनियम 1957 अन्वये कारवाई केली आहे.